AmravatiLatest NewsMaharashtraSports

अमरावतीत जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

४०० खेळाडूंचा सहभाग; सुगम दिव्यांग अभियानासाठी विशेष तरतुदीचा संकल्प

अमरावती, दि. १९ फेब्रुवारी २०२६ : जिल्हा परिषद अमरावतीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ४०० दिव्यांग खेळाडूंच्या सहभागामुळे शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर उद्घाटन

अमरावती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयच्या वतीने १९ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान दोन दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळच्या मैदानावर झालेल्या उद्घाटन समारंभाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, लुईस ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

त्यानंतर क्रीडा ज्योत प्रज्वलित करून हिरवी झेंडी दाखवत स्पर्धेची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

विविध प्रवर्गातील स्पर्धकांचा सहभाग

या स्पर्धेत अस्थिव्यंग, दृष्टीबाधित, कर्णबधीर, बौद्धिक दिव्यांग आणि बहुविकलांग अशा विविध प्रवर्गातील सुमारे ४०० स्पर्धक आणि १५० कर्मचारी सहभागी झाले आहेत. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

‘सुगम दिव्यांग अभियान’वर भर

उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा यांनी ‘सुगम दिव्यांग अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारती दिव्यांगांसाठी सुलभ करण्याचा संकल्प व्यक्त करत येणाऱ्या आर्थिक वर्षात त्यासाठी विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमानंतर त्यांनी सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच त्यांच्या वतीने आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला ज्ञानबा पुंड, पी. डी. शिंदे, ज्ञानेश्वर आमले, अरविंद राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन जीवन गोरे यांनी केले, प्रास्ताविक ज्ञानेश्वर आमले यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानबा पुंड यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button