अमरावतीत घरफोडीचा धाडसी प्रयत्न; VMV परिसरात दहशतीचे वातावरण
अमरावती : शहरात पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. Amravati शहरातील VMV परिसरातील श्रीमंगल कॉलनी येथे गुरुवारी मध्यरात्री ९ ते १० जणांच्या टोळीने शस्त्रांसह धाडसी घरफोडीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरुवारी रात्री अमरावतीच्या VMV रोडवरील श्रीमंगल कॉलनीत ९ ते १० जणांची संशयित टोळी शस्त्रांसह फिरताना दिसली. या चोरट्यांकडे धारदार शस्त्रे होती. त्यांनी दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. याच टोळीने त्याच रात्री एका फ्लॅटमध्ये घुसण्याचाही प्रयत्न केला.
काही घरांची दारे बाहेरून लावून पहाटे सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास चोरीची संधी साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र योग्य संधी न मिळाल्याने चोरट्यांना हात हलवे परत जावे लागल्याचे समजते.
या घटनेनंतर श्रीमंगल कॉलनीसह संपूर्ण VMV परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून या टोळीचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमरावतीत वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस गस्त वाढवण्याची मागणीही आता जोर धरत आहे.



