पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वरळी मटका?

मानोरा शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; वाहतूक पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह
मानोरा (जि. वाशिम) : मानोरा शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र समोर येत असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच वरळी मटका खुलेआम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानोरा पोलीस स्टेशन हद्दीत काही ठिकाणी वरळी मटक्याचे अड्डे उघडपणे सुरू आहेत. पोलीस स्टेशनपासून अत्यंत कमी अंतरावर हा जुगार सुरू असताना संबंधित यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
या अवैध धंद्यांमुळे परिसरातील अल्पवयीन मुलं जुगाराच्या विळख्यात अडकत असल्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी मटक्याच्या चिठ्ठ्या दिसून येत असल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याची चर्चा आहे. वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले असल्याची माहिती असतानाही मानोरा हद्दीत हे प्रकार सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, शहरातील वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे वाहनचालकही त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून सामान भरत असतानाही ‘नो पार्किंग’च्या नावाखाली दंड आकारला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. काही ठिकाणी नो पार्किंगचे फलक नसतानाही दंड वसूल केला जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
याशिवाय काही पांढऱ्या वर्दीतील कर्मचाऱ्यांकडून असभ्य वागणूक दिली जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अवैध धंदे बंद करावेत व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.



