कामरगावात भव्य रामकथा-रामलीला महोत्सव; श्री बालाजी मंदिर परिसर भक्तिमय

कामरगाव : येथील ऐतिहासिक श्री बालाजी मंदिर परिसर सध्या भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान आयोजित भव्य रामकथा आणि रामलीला महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
कामरगाव येथील प्राचीन श्री बालाजी मंदिरात संत सनातन धर्म श्री रामायण प्रचारक मंडळ यांच्या वतीने या भव्य रामकथा व रामलीला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात प्रभू श्रीरामांचा जन्म, वनवास, सीता स्वयंवर, सुवर्णमृग, सीता हरण तसेच लंकेवरील विजय अशा रामायणातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे प्रभावी आणि भावस्पर्शी सादरीकरण केले जात आहे. कलाकारांच्या अभिनयामुळे आणि नेत्रदीपक देखाव्यांमुळे भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध होत आहेत.
दररोज सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी कामरगावसह परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहत आहेत. मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, सुंदर देखावे आणि भक्तिरसात न्हालेलं वातावरण पाहायला मिळत आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून हिंदू संस्कृती आणि धर्मपरंपरेची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरुणांमध्ये आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन, धार्मिक ग्रंथांचे वाचन तसेच रामनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे.



