AmravatiLatest NewsSocial News

संस्कृत भाषाच नव्हे, संस्कृतीचा आत्मा – प्र – कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे .. विद्यापीठात वाड्.वनिता संस्कृत साहित्य संमेलन संपन्न

अमरावती (दि. 17.02.2026) – संस्कृत ही केवळ भाषा नसून, भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला देववाणीची ओळख होईल आणि तिचा वारसा टिकून राहील, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित वाड्.वनिता संस्कृत साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. विचारपीठावर संमेलनाच्या बीजभाषक कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकच्या माजी अधिष्ठाता डॉ. नंदा पुरी, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. रुपाली कविश्वर, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. कलापिनी अगस्ती, विश्व संस्कृत प्रतिष्ठान (वाराणसी) विदर्भ प्रदेश समितीच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती राम पिंजरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.
पहिल्या सत्राचे बीजभाषण करतांना डॉ. नंदा पुरी यांनी ‘संस्कृत साहित्यात महिलांचे योगदान’ या विषयावर अत्यंत चिंतनशील व मार्मिक मार्गदर्शन केले. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांसारख्या प्राचीन महिलावीर, तर आजच्या काळातील विदुषींच्या कार्याचा त्यांनी उल्लेख करून संस्कृतच्या समृध्द वारशात महिलांचे स्थान किती महत्वपूर्ण आहे, हे स्पष्ट केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. रुपाली कविश्वर होत्या. त्यांच्या अभ्यासपूर्ण व ह्मदयस्पर्शी मार्गदर्शनाने उपस्थित भारावुन गेले. दुपारच्या सत्रात डॉ. कलापिनी अगस्ती यांनी ‘संस्कृत साहित्याची आधुनिक काळातील प्रासंगिकता’ या विषयावर मार्गदर्शन करतांना विज्ञान, तंत्रज्ञान व आयुर्वेदाशी संस्कृतचे नाते जोडून आजच्या युगातही देववाणीचे अमूल्य महत्त्व त्यांनी पटवून दिले. सत्राच्या अध्यक्ष डॉ. कीर्ती राम पिंजरकर म्हणाल्या, संस्कृतचा प्रचार व प्रसाराची आपली सामूहिक जबाबदारी असून ती पार पाडावी, असे त्या म्हणाल्या.
संमेलनात विद्याथ्र्यांनी संस्कृत गीते, नाटिका, स्वरचित प्रस्तूती सादर केल्या. मिरा भेरडे या चिमुकलीने बालगीत सादर केले. परमेश्वरी शेलोटकर हिने ‘भगवतगीता स्तोत्र पठण’, मैथिली अजनकर हिने ‘स्त्री भ्रूणहत्या एकपात्री प्रयोग’, आयुर्वेद महाविद्यालयाचे राजेंद्र गोळे यांनी ‘आयुर्वेद एक विचार’ यावर आपले विचार मांडले. तर समूहगटात गृहविज्ञान विभागाने पोवाडा, महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी ‘ऐगीरी नंदिनी’ हे स्तोत्रपठण सादर केले. याप्रसंगी स्वप्ना प्रशांत यावले यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. वेदांचा सामान्य परिचय व दशरूपकम् ही दोन पुुस्तके एम.ए. संस्कृतच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात आहेत. समारोप सत्रात पुस्तके व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. प्रास्ताविक विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख यांनी,प्रा. स्वप्ना यावले यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सूत्रसंचालन राहुल लोधा व प्रियांका मोहोड, तर आभार आकाश हरणे यांनी मानले. संमेलनाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थीनी, गणमान्य नागरिक उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button