पुणे: सहलीचा आनंद विरला! विद्यार्थ्यांची एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात; १५ चिमुकले जखमी

पुणे/ओतूर: शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्रीच्या सहलीसाठी निघालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या एसटी बसला कल्याण–आहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात झाला. ओतूर परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने बस डिव्हायडरला धडकून पलटी झाली. या अपघातात १० ते १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेची सहल जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी निघाली होती. बसमध्ये एकूण ५३ विद्यार्थी आणि शिक्षक होते. पहाटेच्या सुमारास बस ओतूरजवळ पोहोचली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. बस वेगाने डिव्हायडरला धडकली आणि महामार्गावरच पलटी झाली.
स्थानिकांची धाव आणि बचावकार्य
अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून आणि दरवाजातून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनही दाखल झाले.



