चंद्रपुरात राजकीय महाभूकंप! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला पाठिंबा; ‘महापौर’ भाजपचा, तर ‘उपमहापौर’ शिवसेनेचा बसणार

चंद्रपूर: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी बातमी समोर येत आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत अखेर ‘ट्विस्ट’ आला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा घेत भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन चंद्रपुरात सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
काय आहे नवा पॉवर फॉर्म्युला?
भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात झालेल्या चर्चेनुसार सत्तेचे वाटप खालीलप्रमाणे ठरल्याचे समजते:
- महापौरपद: पहिले सव्वा वर्ष भाजप, त्यानंतर सव्वा वर्ष शिवसेना (उबाठा).
- उपमहापौरपद: संपूर्ण अडीच वर्षांच्या काळासाठी शिवसेना (उबाठा) कडे राहणार.
- स्थायी समिती: पहिल्या आणि चौथ्या वर्षी स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेना (उबाठा) कडे असेल.
काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका
चंद्रपूर मनपात ६६ सदस्यांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक २७ जागा असूनही अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना सत्ता राखण्यात अपयश येताना दिसत आहे. धानोरकर आणि वडेट्टीवार गटातील संघर्ष थेट दिल्लीपर्यंत पोहोचला होता. त्यातच मित्रपक्ष शेकापनेही उपमहापौर पदासाठी स्वतंत्र अर्ज भरल्याने काँग्रेसची कोंडी झाली. हीच संधी साधत भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी ऑफर देऊन आपल्या बाजूला वळवण्यात यश मिळवले आहे.
उमेदवारांची सद्यस्थिती
महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे.
| पद | भाजप-शिवसेना युती | काँग्रेस गट |
| महापौर | संगीता खांडेकर / सारिका संदूरकर | संगीता भोयर / संगीता अमृतकर / वैशाली महाडूळे |
| उपमहापौर | संजय कंचर्लावार (भाजप) / उबाठा उमेदवार | वसंत देशमुख / राहुल चौधरी |
संजय राऊतांच्या भूमिकेकडे लक्ष
विशेष म्हणजे, काही वेळापूर्वीच खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना “भाजपची सत्ता येईल असे वर्तन आमचे नेते करणार नाहीत” असे संकेत दिले होते. मात्र, स्थानिक स्तरावर शिवसैनिकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने वरिष्ठ पातळीवर याला संमती आहे की हा केवळ स्थानिक ‘अॅडजस्टमेंट’चा भाग आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
या अनपेक्षित युतीमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार की चंद्रपूरचा पॅटर्न राज्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



