हिमाचलमध्ये थंडीचे थैमान; मुंबईच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

हिमाचल प्रदेश सध्या निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईतील एका तरुणीचा मनाली येथे दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणीचे नाव प्रियंका विष्णू दुखंढे (रा. काळाचौकी, मुंबई) असे आहे. त्या आपल्या मावशीसोबत मनालीपासून सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध सोलांग व्हॅली येथे पर्यटनासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासादरम्यान अचानक त्यांना तीव्र थंडीचा त्रास जाणवू लागला, अंगाला हुडहुडी भरली आणि प्रकृती झपाट्याने खालावली.
तत्काळ त्यांना मनालीतील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचताच त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार ‘कोल्ड एक्स्पोजर’ (अतिथंडीचा तीव्र परिणाम) हे मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून मनालीतील तापमान शून्याखाली घसरले आहे. केवळ थंडीच नव्हे तर इतर नैसर्गिक आपत्तीही या भागाला हादरवत आहेत.
गुरुवारी पहाटे ३:५९ वाजता किन्नौर जिल्ह्यात ३.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला; केंद्रबिंदू चांगो परिसरात होता. त्याच दिवशी सकाळी कुल्लू जिल्ह्यातील पहनाला गावाजवळ भूस्खलन झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
हिमाचलमधील या घडामोडींमुळे प्रशासन सतर्क झाले असून पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



