२,२०० कोटी रुपये स्वाहा! IND vs PAK मॅच रद्द झाल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; आयसीसी आणि ब्रॉडकास्टर्सना बसणार ‘फायनान्शिअल शॉक’

नवी दिल्ली/कोलंबो: टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात एका मोठ्या वादाने तोंड वर काढले आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली असली, तरी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यावर मात्र अधिकृत बहिष्कार टाकला आहे. या निर्णयामुळे केवळ चाहत्यांचीच निराशा झाली नसून, आयसीसी (ICC) आणि ब्रॉडकास्टर्सच्या तिजोरीला तब्बल २,२०० कोटी रुपयांहून अधिक (सुमारे २५० दशलक्ष डॉलर्स) मोठे भगदाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका सामन्याची किंमत २,२०० कोटी कशी?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा ‘कमर्शियल इव्हेंट’ मानला जातो.
- जाहिरातींचा पाऊस: या सामन्यासाठी १० सेकंदांच्या जाहिरातीचा दर २५ ते ४० लाख रुपयांपर्यंत असतो. सामना रद्द झाल्यास यजमान ब्रॉडकास्टरला (JioStar) सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांचा थेट जाहिरात महसूल गमवावा लागेल.
- डिजिटल आणि टीव्ही व्ह्यूअरशिप: मागील विश्वचषकात या सामन्याने व्ह्यूअरशिपचे सर्व विक्रम मोडले होते. या वेळीही कोट्यवधींच्या संख्येने येणाऱ्या प्रेक्षकांमुळे मिळणारे ‘ब्रँड व्हॅल्यू’ आणि ‘स्पॉन्सरशिप’ धोक्यात आली आहे.
- टोटल व्हॅल्यू: तज्ज्ञांच्या मते, तिकीट विक्री, जाहिराती, ब्रॉडकास्टिंग राइट्स आणि हॉटेल-पर्यटन व्यवसाय मिळून या एका सामन्याची अंदाजे किंमत २५० मिलियन डॉलर्स म्हणजेच २,२०० कोटींहून अधिक आहे.
पाकिस्तानला बसणार मोठा ‘दंड’; कंगाल होण्याची भीती
पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकल्यास भारताला तांत्रिकदृष्ट्या ‘वॉकओव्हर’ (Walkover) मिळेल आणि २ गुण भारताच्या खात्यात जमा होतील. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील: १. आयसीसीचा दंड: आयसीसी पीसीबीच्या वार्षिक महसूल वाटपात (सुमारे ३४.५ दशलक्ष डॉलर्स) मोठी कपात करू शकते. २. कायदेशीर लढाई: ब्रॉडकास्टर्स आणि जाहिरातदार करारभंग झाल्याप्रकरणी पीसीबीवर कोट्यवधींचे दावे ठोकू शकतात. ३. विमा कवच नाही: हा बहिष्कार ‘स्वेच्छेने’ असल्याने पीसीबीला विम्याचे संरक्षणही मिळणार नाही, ज्यामुळे बोर्डाची आर्थिक कंबर मोडू शकते.
वादाचे मूळ काय?
पाकिस्तानच्या या आक्रमक पवित्र्यामागे ‘बांगलादेश कनेक्शन’ असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा कारणास्तव भारतात येण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या जागी स्कॉटलंडला स्थान दिले. आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने भारतावर बहिष्कार टाकण्याचे पाऊल उचलले आहे.
ग्रुप-ए मधील स्थिती
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये एकूण २० संघ असून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप-ए मध्ये आहेत. या ग्रुपमध्ये अमेरिका, नेदरलँड आणि नामिबिया यांचाही समावेश आहे. आता १५ फेब्रुवारीला श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यावर काय मधला मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“एका सामन्याचे मूल्य २५० मिलियन डॉलर्स आहे आणि पाकिस्तानचे वार्षिक उत्पन्न अवघे ३५.५ मिलियन डॉलर्स. हा फरकच स्पष्ट करतो की हा निर्णय पाकिस्तानसाठी किती महागात पडू शकतो.” > — सामी-उल-हसन बर्नी, माजी कम्युनिकेशन्स प्रमुख, आयसीसी/पीसीबी



