Latest NewsMaharashtra Politics

मुंबईत मराठी तरुणाला ‘घाटी’ म्हणत बिल्डरकडून मारहाण! ‘तुम लोग नही सुधरोगे’ म्हणत अपमान; मनसे पेटली, दिला ‘खळ्ळ-खट्याक’चा इशारा

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी तरुणाला ‘घाटी’ म्हणत अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना चेंबूर परिसरात घडली आहे. या घटनेचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

क्षुल्लक कारण आणि जातीवाचक शिवीगाळ

तक्रारदार तरुण सुशील रहेजा यांच्या चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, कागदपत्रांना स्टॅपल (Staple) व्यवस्थित न मारल्याच्या एका क्षुल्लक कारणावरून रहेजा यांचा पारा चढला. त्यांनी त्या तरुणाला मारहाण करत “तुम घाटी लोग कभी नही सुधरोगे” अशा शब्दांत हिणवले आणि जातीवाचक शिवीगाळ केली.

पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर पीडित तरुणाने गोवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बिल्डर सुशील रहेजा यांच्या विरोधात खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:

  • भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ – कलम ११५
  • अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ (Atrocity Act)

मनसेचा इशारा: “रस्त्यावरचा न्याय आपल्या पद्धतीने करू!”

मनसे नेते गजानन काळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे.

“केंद्रात, राज्यात आणि मुंबईत भाजपची सत्ता आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण… ही धोक्याची घंटा आहे! आता आशिष शेलार आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने हा बिल्डर जेलमध्ये जातो की बाहेर राहतो हे पाहू. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच!”गजानन काळे, नेते, मनसे

मराठी विरुद्ध अमराठी वाद पुन्हा चर्चेत

काही दिवसांपूर्वीच मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर बसवल्यावरून वाद सुरू असतानाच, मुंबईत घडलेल्या या घटनेमुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट आहे. “मुंबईत राहून मराठी माणसालाच हिणवणाऱ्यांची मस्ती उतरवावी लागेल,” अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.

पुढील पाऊल: गोवंडी पोलीस याप्रकरणी सुशील रहेजा यांना अटक करतात की राजकीय दबावामुळे कारवाई लांबणीवर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रहेजा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button