मीरा-भाईंदरमध्ये भाजपचा डंका! डिंपल मेहता पुन्हा एकदा महापौरपदी; मराठीच्या मुद्द्यावरून निदर्शने, तरीही विरोधकांचा धुव्वा

मीरा-भाईंदर: राजकीय वादंग आणि मराठी एकीकरण समितीच्या तीव्र विरोधानंतरही मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर अखेर भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील यांची उपमहापौरपदी एकमताने निवड झाली आहे. या निवडीमुळे शहरात पुन्हा एकदा ‘मेहता पर्वा’ची अधिकृत सुरुवात झाली असली तरी, अमराठी महापौराच्या मुद्द्यावरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निर्विवाद बहुमत: ७९ विरुद्ध १६ चा सामना
मंगळवारी पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेत भाजपने आपली ताकद दाखवून दिली. ९५ जागांच्या सभागृहात भाजपने ७८ जागांवर विजय मिळवला होता. मतदानावेळी एका अपक्ष नगरसेवकानेही भाजपला पाठिंबा दिल्याने डिंपल मेहता यांना एकूण ७९ मते मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवार रुबिना शेख यांना केवळ १६ मते मिळाल्याने त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
‘मेहता घराणेशाही’ आणि भाजपचा विश्वास
डिंपल मेहता या माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी असून त्यांनी दुसऱ्यांदा महापौरपदाची खुर्ची भूषवली आहे. तसेच उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील हे नरेंद्र मेहता यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
मराठी अस्मितेचा लढा: महापालिकेबाहेर आंदोलनाचा वणवा
मराठी एकीकरण समिती आणि मनसेने ‘मीरा-भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा’ असा आक्रमक पवित्रा घेतला होता. निवडीच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात निदर्शने करण्यात आली.
- आरोप: “मराठी राज्यात मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर बसवला जात आहे,” अशी टीका समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी केली.
- इशारा: शपथविधी मराठीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
प्रताप सरनाईकांचे विरोधकांना सडेतोड उत्तर
या वादात उडी घेत शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले:
“मराठी एकीकरण समिती निवडणूक काळात कुठे होती? त्यांनी तेव्हा भाजपच्या २८ नगरसेवकांना पाडण्यासाठी उबाठा आणि मनसेला पाठिंबा दिला. जर तेव्हा आम्हाला साथ दिली असती, तर आज ही आंदोलने करण्याची वेळ आली नसती.” त्यांनी पुढे असाही प्रश्न विचारला की, गीता जैन यांच्या वेळी असा विरोध का झाला नव्हता?



