Latest NewsMaharashtra Politics

‘भाजप मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष’; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित दादांच्या निधनाचा शोक अद्याप ओसरलेला नसतानाच, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत भाषेत भाजपवर टीका केली आहे.

“भाजपकडे माणुसकी नाही”

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “अजित पवारांच्या मृत्यूचा दुखवटा अजून संपलेला नाही, सुनेत्रा वहिनींचे डोळे अजूनही ओले आहेत. अशा परिस्थितीत राजकीय सत्तेची पदे भरण्याची घाई करणे हे अमानुष आहे. भाजप हा पक्ष ‘मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा’ पक्ष आहे.”

बाळासाहेबांच्या आठवणींना दिला उजाळा

राऊत यांनी केवळ सद्यस्थितीवरच नाही, तर भूतकाळातील घटनांचाही दाखला दिला. “आम्ही हे फक्त आजच्या परिस्थितीवरून बोलत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही भाजपने अशाच प्रकारच्या राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे माणुसकी नावाचा प्रकार उरलेला नाही,” असा आरोप राऊत यांनी केला.

सुनेत्रा पवारांच्या नियुक्तीवर सावध प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार या बारामतीहून मुंबईत दाखल झाल्या असून आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, “हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. उपमुख्यमंत्रीपद दुर्दैवी घटनेमुळे रिक्त झाले आहे, त्यावर काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा पक्ष ठरवेल. पण सध्याच्या परिस्थितीत हे सर्व शोभणारे नाही. मी योग्य वेळ आल्यावर यावर सविस्तर भाष्य करेन.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button