नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग

नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात आज मोठी आग लागल्याची घटना घडली. महापे एमआयडीसीतील W-177 क्रमांकावर असलेल्या ‘बिटाकेम’ (Betachem) या केमिकल कंपनीत अचानक आग भडकली. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल साठा असल्याने काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले.
आगीमुळे संपूर्ण महापे परिसरात दाट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुदैवाने, या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, कंपनीतील कच्चा माल व यंत्रसामग्रीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून आगीच्या कारणांचा तपास केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, परिस्थितीवर प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे.



