BuldhanaCrime NewsLatest News

लव्हाळा फाटा येथील ‘हॉटेल सातबारा’मधील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणीक्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

मेहकर | प्रतिनिधी गजानन राऊत

मेहकर तालुक्यातील लव्हाळा फाटा परिसरात असलेल्या हॉटेल सातबारा येथे देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या खुलेआम विक्री सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या बेकायदेशीर दारू विक्रीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लव्हाळा फाटा हा अत्यंत वर्दळीचा व रहदारीचा भाग आहे. येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, दारूच्या नशेतून भांडणे, मारामाऱ्या, शिवीगाळ तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः महिला, विद्यार्थी आणि प्रवासी नागरिकांना भीतीचे वातावरण असून परिसर दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालला आहे.

शाळा, वस्ती व धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ नियमबाह्य दारू विक्री सुरू असल्याने सामाजिक वातावरण गंभीररीत्या बिघडत आहे. या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत ठराव करून संबंधित प्रशासनाकडे निवेदने दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा प्रकार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अंतर्गत गंभीर गुन्हा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर वरदडा ग्रामस्थ व क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने साखरखेर्डा पोलीस स्टेशन, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मेहकर विभागीय दंडाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. हॉटेल सातबारा येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.

तसेच भविष्यात अशा प्रकारची बेकायदेशीर दारू विक्री पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त व कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच उच्चस्तरीय प्रशासकीय व न्यायालयीन तक्रारी दाखल केल्या जातील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी सचिन आसाबे, किसन आसाबे, संदीप आसाबे, हनुमान मेव्हणकर, शरद मेव्हणकर, संजय आसाबे, विठ्ठल आसाबे, हरिदास आसाबे, संदीप खरात, सचिन खरात, कुंडलिक खरात, प्रभाकर आसाबे, (बावाजी) नागेश आसाबे, दिनकर आसाबे, हनुमान आसाबे, सुधाकर आसाबे, नंदू धंदरे आदी ग्रामस्थ व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button