JalgaonLatest NewsSocial News

धर्माच्या पलीकडे गेलेली माणुसकी; यावलमधील घटनेने दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

यावल

ज्या काळात धर्म, जात आणि पंथाच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे प्रकार वाढत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातून माणुसकी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जिवंत आदर्श समोर आला आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते किती श्रेष्ठ असते, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

यावल येथील देवरे–सोनार कुटुंबाकडे कासमपूर खान उर्फ खान बाबा हे मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ सराफी कारागीर म्हणून कार्यरत होते. तरुण वयात कामानिमित्त यावल येथे आलेले खान बाबा कालांतराने या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले. दीर्घकाळच्या सहवासातून हे नाते केवळ कामापुरते न राहता आपुलकीचे आणि कौटुंबिक झाले.

वयाची शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर वार्धक्यामुळे खान बाबा काम करू शकत नव्हते. मात्र काम थांबले तरी देवरे–सोनार कुटुंबाने त्यांना कधीही परके मानले नाही. घरातील सदस्याप्रमाणे त्यांचा सांभाळ करण्यात आला.

मंगळवारी वृद्धापकाळाने खान बाबांचे निधन झाले. निधनानंतरही देवरे–सोनार कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवत खान बाबांची अंत्ययात्रा आपल्या घरातूनच निघावी, अशी इच्छा व्यक्त केली. मुस्लिम धर्मीय रीतिरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदू कुटुंबाच्या घरातून निघालेल्या या अंत्ययात्रेमुळे संपूर्ण यावल शहरात भावुक आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी या घटनेचे मनापासून स्वागत करत देवरे–सोनार कुटुंबाच्या माणुसकीचे कौतुक केले.

आज समाजात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असताना, यावलमधील ही घटना सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश देणारी ठरली आहे. धर्म वेगळा असू शकतो, पण माणुसकी एकच असते, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button