Latest NewsMaharashtraSocial News

दर्पण दिनानिमित्त माहूर पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान

माहूर

दर्पण दिनाच्या निमित्ताने माहूर पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पत्रकार हे समाजाचा आरसा आहेत, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांनी यावेळी केले.

दर्पण दिनानिमित्त माहूर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे होते. यावेळी पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या हस्ते पत्रकारांचा डायरी, नोटबुक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना भोंडवे यांनी सांगितले की, पत्रकार हे शासन आणि जनतेतील महत्त्वाचा दुवा आहेत. समाजात घडणाऱ्या घटना, अन्याय, अनिष्ट प्रथा तसेच गोरगरीब जनतेवरील अत्याचारांना वाचा फोडण्याचे कार्य पत्रकार प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.

पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनीही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत, पोलीस प्रशासनाला पत्रकारांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व सर्व पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांनी मनोगत व्यक्त करत, पोलीस प्रशासनाने आयोजित केलेल्या या सन्मान सोहळ्याबद्दल आभार मानले. भविष्यातही पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला माहूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button