AmravatielectionLatest NewsMaharashtra Politicspolitics

अमरावती महापालिका निवडणूक: बेलपुरात रवी राणांची जाहीर सभा; विकासाचं थेट आवाहन

अमरावती | प्रतिनिधी, किल्लेदार

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आज बेलपुरा परिसरात युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या सभेत रवी राणा यांनी मतदारांना थेट विकासाचे आव्हान दिले.

अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, स्वामी विवेकानंद बेलपुरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रभाग १२-अ मधून संजय माहुरकर, प्रभाग १२-ब मधून ॲड. प्रीती रेवणे-बनारसे, प्रभाग १२-क मधून अर्चना गणेश ताल्हन, तर ड गटातून निखिल उर्फ आकोटकर हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेलपुरा येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित जाहीर सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात “रविभाऊ” यांचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर “पाना आया रे पाना” या घोषणांनी दुमदुमून गेला.

सभेत बोलताना आमदार रवी राणा यांनी मतदारांना आवाहन करत सांगितले की, पाना या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून अमरावती शहराच्या विकासाला गती द्या. अमरावती महानगरपालिकेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरीव निधी आणून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचा वादाही त्यांनी यावेळी केला.

सभेदरम्यान रवी राणा यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत गाडगे नगरमधील “कटप्पा” या उल्लेखाने त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. घड्याळ या निवडणूक चिन्हावर टीका करत “घडीचे काटे उलटे फिरवा आणि पाण्याला बहुमत द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा दिवाळी साजरी करण्याची घोषणा करत, दिवाळी किराणा तसेच महिलांना साडी देण्याचे आश्वासनही रवी राणा यांनी या सभेत दिले. या सभेमुळे बेलपुरा परिसरात राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे पाहायला मिळाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button