AmravatielectionLatest NewsMaharashtra Politicspolitics

अमरावती महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान खळबळ; युवा स्वाभिमानी पक्षाच्या बूथजवळ तलवारीसह हैदोसआमदार रवी राणा यांच्यावर हल्ल्याचा डाव होता का? शहरात चर्चांना उधाण

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राजापेठ येथील संत कवा रामनगर परिसरात उभारण्यात आलेल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या प्रचार बूथजवळ काही समाजकंटकांनी थेट तलवारी घेऊन दहशत माजवल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली असून, ही घटना आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा डाव होता का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या अमरावती शहरात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. युवा स्वाभिमानी पक्ष शहरात ताकदीने निवडणूक लढवत असून अनेक प्रभागांमध्ये पक्षाला मोठे जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राजापेठ संत कवा रामनगर परिसरातील प्रचार बूथजवळ अचानक काही समाजकंटकांनी तलवारी घेऊन हैदोस घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

या घटनेमुळे प्रचारासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, ही केवळ दहशत निर्माण करण्याची घटना होती की यामागे कोणते मोठे षडयंत्र रचले गेले होते, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.

विशेष म्हणजे, आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा डाव तर नव्हता ना, असा संशयही व्यक्त केला जात आहे. युवा स्वाभिमानी पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता लक्षात घेता, विरोधकांकडून दबावाचे राजकारण किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button