फ्रेजरपुरा हद्दीत हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई; ७७ हजारांचा मुद्देमाल नष्ट

अमरावती
अमरावती शहरातून मोठी पोलीस कारवाई समोर आली असून, फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने हातभट्टी दारूविरोधात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध दारू व साहित्य नष्ट केले आहे. या कारवाईत तब्बल ७७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ८ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेचे पथक फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने वडाळी येथील बांबू गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगल परिसरात छापा टाकला.
या छाप्यात दिनेश माणिकराव नेमाडे (वय ४० वर्षे, रा. परिहारपुरा, वडाळी) हा आरोपी हातभट्टी दारू काढताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता हातभट्टी दारू – १०० लिटर, मोहमास सडवा – २०० लिटर तसेच दारू काढण्यासाठी लागणारे इतर साहित्य आढळून आले.
सर्व अवैध दारू व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले असून, या कारवाईत एकूण ७७,८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे फ्रेजरपुरा येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (क)(फ)(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
अवैध दारूविक्री व हातभट्टी दारूविरोधात अशाच कठोर कारवाया पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



