नागपुरात धक्कादायक घटना : किरकोळ वादातून मित्रांकडूनच मित्राची निर्घृण हत्या, एक गंभीर जखमी

नागपूर
नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेत आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला आहे.
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंशू नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे तिघे परस्पर मित्र होते. मंगळवारी रात्री हे तिघेही एकत्र बसून दारू पित होते. दारू पिऊन घरी परतत असताना ‘मुस्तफा उर्फ बोंडू ईशा अंसारी’ याच्याशी एका मित्राच्या मैत्रिणीला पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला.
सुरुवातीला हा वाद किरकोळ स्वरूपाचा होता, मात्र काही वेळातच तो विकोपाला गेला. या वादातून आरोपी मित्रांनीच लोखंडी रॉड आणि चाकूने मुस्तफावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात मुस्तफाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.
दारूच्या नशेत आणि क्षणिक रागातून घडलेली ही घटना पुन्हा एकदा मैत्रीवरचा विश्वास हादरवणारी ठरली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



