BuldhanaCrime NewsLatest News

वनविभागात नोकरी लावण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; रामटेक पोलिसांनी टोळीचा केला पर्दाफाश

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा रामटेक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नियुक्तीपत्रे देऊन ही टोळी सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील पवन काठोळे आणि उषा मस्के यांची सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मुख्य आरोपी गजानन कानडे याने नागपूर वनविभागात वनरक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १२ लाख रुपयांची मागणी केली होती.

यानंतर आरोपींकडून व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आलेल्या जॉइनिंग लेटरवर संशय निर्माण झाला. या पत्रावर नागपूरचा शिक्का आणि गोंदिया येथील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असल्याचे आढळून आले. या विसंगतीमुळे पीडितांनी सतर्कता बाळगून पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर रामटेक पोलिसांनी सापळा रचत गजानन कानडे, विलास जाधव आणि अंकित पानतावणे यांना रंगेहात अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून दोन कार तसेच अनेक बनावट शासकीय शिक्के जप्त केले आहेत.

या प्रकरणात आणखी आरोपी सामील असण्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, या टोळीने आणखी किती तरुणांची फसवणूक केली आहे, याचा तपास केला जात आहे.

रामटेक पोलिसांच्या या कारवाईमुळे नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button