महानगरपालिका निवडणूक २०२५–२६: प्रभाग क्रमांक ३ मधून ३२ उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

अमरावती:
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन प्रक्रियेला वेग आला असून प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नवसारी क्रमांक ४, जमील कॉलनी, लाल खडी, नवसारी ७ ते जवाहर स्टेडियम परिसरातून एकूण ३२ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत.
सदर नामनिर्देशन प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बी-फॉर्मसह अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, एआयएमआयएम, शिवसेना (शिंदे गट) तसेच इतर पक्षांच्या उमेदवारांनी सध्या अपक्ष स्वरूपात नामनिर्देशन अर्ज भरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांना मंगळवार, ३० डिसेंबरपर्यंत बी-फॉर्म जोडण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी २४ तासांत प्रभाग क्रमांक ३ मधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, अधिकृत पक्षीय उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता आहे.



