पुण्यात धक्कादायक प्रकार! प्रेमविवाहानंतर अवघ्या २४ तासांत डॉक्टर जोडप्याचा घटस्फोट; कारण ऐकून सर्वच हादरले

अरेंज मॅरेजपेक्षा प्रेमविवाहात एकमेकांना आधीपासून ओळखण्याची संधी मिळत असल्याने लग्नानंतर अडचणी कमी येतात, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र पुण्यात समोर आलेल्या एका अनोख्या आणि धक्कादायक घटनेने हा समजच हादरवून सोडला आहे. पुण्यातील एका उच्चशिक्षित डॉक्टर जोडप्याने प्रेमविवाह केला, मात्र लग्नाच्या अवघ्या २४ तासांतच त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटामागील कारण जाणून नातेवाईक, पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणाही थक्क झाली आहे.
२४ तासांत संसार मोडला, ८ दिवसांत घटस्फोट
या प्रकरणातील सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या ८ दिवसांत या जोडप्याचा घटस्फोट मंजूर झाला. पुणे कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. कदम यांनी हा महत्त्वाचा निर्णय दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
घटस्फोट घेतलेलं हे जोडपं समाजातील एका प्रतिष्ठित वर्गातील आहे. पती उच्च पदावर कार्यरत असून, पत्नी डॉक्टर आहे. दोघांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली होती आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेम फुलल्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला.
मात्र, लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहोचलं.
कायदेशीर प्रक्रिया कशी पूर्ण झाली?
३ डिसेंबर रोजी वकील राणी कांबळे-सोनवणे यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सामान्यतः घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी अनिवार्य असतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर जोडपं १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ वेगळं राहत असेल, तर हा कालावधी माफ केला जाऊ शकतो. या प्रकरणात जोडपं दीड वर्षांपासून वेगळं राहत असल्याचं स्पष्ट झालं. तसेच पतीला कामासाठी तातडीने परदेशात जाण्याची आवश्यकता असल्याने न्यायालयाने १० डिसेंबर रोजी घटस्फोट मंजूर केला.
वैचारिक मतभेद ठरले कारण
विभक्ततेदरम्यान दोन्ही कुटुंबीयांनी त्यांना समजावण्याचा आणि संसार वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वैचारिक मतभेद इतके तीव्र होते की दोघेही पुन्हा एकत्र येण्यास तयार झाले नाहीत. अखेर कायदेशीररित्या नातं संपवणंच योग्य, असा निर्णय त्यांनी घेतला.
या घटनेमुळे समाजात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, वाढत्या घटस्फोटांच्या पार्श्वभूमीवर क्षुल्लक कारणांमुळे नातेसंबंध तुटत असल्याची चिंताही व्यक्त केली जात आहे.



