भोकरदनमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन आक्रमक; प्रशासनाकडून लेखी आश्वासन

सरपंच मंगेश साबळे मैदानात उतरल्याने आंदोलनाला वेग
भोकरदन | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भोकरदन तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आता आक्रमक वळण मिळाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध सरपंच मंगेश साबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत थेट प्रशासनाला इशारा दिला. यानंतर अखेर प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली.
भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्न-पाणी त्यागून उपोषणावर बसले होते. मात्र पाच दिवस उलटूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
दरम्यान, आंदोलनस्थळी दाखल झालेल्या मंगेश साबळे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत ‘डफडे बजाव’ आंदोलन केले. त्यांनी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. “शेतकऱ्यांच्या लेकरांच्या भविष्याशी खेळू नका,” अशा शब्दांत साबळे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सुनावले.
या आंदोलनात गायगोठा, शेततळे आणि विहिरींची थकीत देयके त्वरित अदा करावीत, ‘मस्टर झिरो’ प्रणालीतून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालावा, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी तातडीने चर्चा केली. मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत १५ ते २० मिनिटांत लेखी आश्वासन देण्याचे प्रशासनाने मान्य केले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले.



