Crime NewsGondiaLatest News

पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून जंगलात नेऊन खून करण्याचा प्रयत्न

वेळीच नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला, आरोपी पती अटकेत

गोंदिया

गोंदिया जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने तिला जंगलात नेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने, नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी–येलोडी परिसरात २२ डिसेंबर रोजी घडली. मारोती मोडकू ठाकरे (वय ६१, रा. जांभळी) असे आरोपी पतीचे नाव असून, सीताबाई मारोती ठाकरे (वय ५५) असे जखमी पत्नीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे दाम्पत्य बोंडे गावावरून मोटारसायकलने घरी परतत असताना चिचगड धाबे–पवनी मार्गावरील खडीघाट जंगल परिसरात पोहोचले. यावेळी आरोपी पतीने अचानक मोटारसायकल जंगलाच्या दिशेने वळवून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हल्ल्यावेळी सीताबाईंनी जोरजोरात आरडाओरड केल्याने त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे आरोपीचा पुढील अनर्थ टळला.

गंभीर जखमी अवस्थेत सीताबाईंना तातडीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले आणि पोलीस कर्मचारी यु. एन. इंदुरकर यांनी पंचनामा करून आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button