उत्तर भारतीयांसाठी काँग्रेसचा स्वतंत्र जाहीरनामा जाहीर; रिक्षावाले, तबेलेवाले, फेरीवाल्यांसाठी 7 मोठी आश्वासने

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने उत्तर भारतीय समाजासाठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर केला आहे. रविवारी मालाड येथे आयोजित ‘संवाद उत्तर भारतीयों से, चर्चा मुद्दों पर’ या कार्यक्रमात या जाहीरनाम्याचं औपचारिक प्रकाशन करण्यात आलं.
या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय उपस्थित होते.
संवादातून जाहीरनाम्याची निर्मिती
उत्तर भारतीय सेलच्या वतीने, वर्षा गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही मोहीम मुंबईतील विविध भागांत राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान काँग्रेसच्या पथकांनी—
- गायी-म्हशींचे गोठे (तबेले)
- धोबी घाट
- ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालक
- फेरीवाले
- कामगार वस्त्या
येथे प्रत्यक्ष भेट देऊन उत्तर भारतीय समाजाच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची थेट नोंद घेतली. त्यावर आधारित हा स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
उत्तर भारतीय समाजाच्या प्रमुख मागण्या
या जाहीरनाम्यात फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, सामाजिक-राजकीय संरक्षण, रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सुविधा, धार्मिक सणांसाठी मूलभूत सोयी आणि दुग्ध व्यवसायासाठी परवानगी धोरण यांचा समावेश आहे.
जाहीरनाम्यातील 7 प्रमुख आश्वासने
1) छठ पूजेसाठी कायमस्वरूपी सुविधा
छठ पूजेसाठी समुद्रकिनाऱ्यांवर कायमस्वरूपी विसर्जन तलाव आणि घाट, महिलांसाठी कपडे बदलण्याच्या खोल्या, उत्तम प्रकाश व्यवस्था आणि लाइफगार्ड सेवा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन.
2) भव्य ‘प्रवासी भवन’
सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी मोठ्या आणि परवडणाऱ्या प्रवासी सुविधा (प्रवासी भवन) उभारण्याची योजना.
3) सणासुदीच्या काळात प्रतीक्षा हॉल
दिवाळी व छठ पूजेदरम्यान रेल्वे स्थानकांजवळ १० ते ५० रुपयांत निवास व जेवणाची सुविधा असलेले प्रतीक्षा हॉल, बीएमसी व रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने.
4) पारदर्शक फेरीवाला धोरण
स्मार्ट वेंडिंग झोन, पात्र विक्रेत्यांसाठी डिजिटल परवाने, तसेच टाउन वेंडिंग समितीच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्षपणे घेण्याचं आश्वासन.
5) उत्तर भारतीयांसाठी सामाजिक-राजकीय संरक्षण
उत्तर भारतीय समाजाच्या सन्मान, सुरक्षितता आणि उपजीविकेचं संरक्षण करण्यासाठी ठोस धोरण.
6) ऑटो-टॅक्सी चालकांसाठी सुविधा
ऑटो व टॅक्सी चालकांसाठी सीएनजी स्टेशनवर विश्रांती केंद्रे, तसेच मोफत आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन.
7) तबेल्यांसाठी परवानगी धोरण
शहरातील दुग्धशाळा (तबेले) यांच्यासाठी पारदर्शक परवाना धोरण आणि पाण्याच्या दरात सबसिडी देण्याची घोषणा.
राजकीय वर्तुळात चर्चा
उत्तर भारतीय समाजासाठी स्वतंत्र जाहीरनामा जाहीर करून काँग्रेसने मुंबईतील राजकारणात नवा मुद्दा उपस्थित केला असून, या घोषणेमुळे महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांवर याचा नेमका किती प्रभाव पडतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



