ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी, 72 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ? – संजय राऊत

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. या युतीनंतर काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी 72 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपरिषद निकालानंतर महाविकास आघाडी सतर्क
राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकांमध्ये भाजपसह महायुतीची यशस्वी घौडदौड पाहायला मिळत आहे. या निकालानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली असून, आघाडीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
“महाविकास आघाडी तुटलेली नाही” – संजय राऊत
महाविकास आघाडी तुटली आहे का? पुढे काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले,
“अजून 72 तास शिल्लक आहेत. या काळात बरेच काही घडू शकते.”
काँग्रेसला सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट करत ते म्हणाले,
“काँग्रेस हा महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आम्ही त्यांच्या दिल्लीतील नेत्यांशी, हायकमांडशी चर्चा केली आहे. त्यांचं मन वळवण्याचं काम सुरू आहे. आमच्यात कोणतीही कटुता नाही. जरी ते वेगळं लढत असले तरी आम्ही एकत्र आहोत.”
मुंबईत काँग्रेस स्वबळावर, कारण काय?
राज ठाकरेंमुळे मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मुंबईत स्वबळावर लढण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
“कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे,” असे चेन्निथला यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.
राष्ट्रवादी (SP) ठाकरे बंधूंसोबत?
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मुंबईत ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी (SP)चे मुंबईतील स्थानिक नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युतीस अनुकूल असल्याचं समजत आहे.
शिवसेना-मनसे जागावाटपावर शिक्कामोर्तब?
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले,
“दोन्ही पक्षांचे नेते सामना कार्यालयात बसले होते. चर्चा पूर्ण झाली आहे. जागावाटप ठरलं आहे. कोण कुठे लढणार हे निश्चित झालं आहे. कुठलीही अडचण नाही. ज्या अडचणी होत्या त्या ठाकरे बंधूंनी मिळून दूर केल्या आहेत. ही शेवटची बैठक मानावी. येत्या एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा होईल.”
“नगरपालिका निवडणुकांत पैशांची गारपीट” – राऊतांचा आरोप
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांवर भाष्य करताना संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
“विधानसभेचे निकाल पाहता मशीन तशीच सेट आहे. आकडे तेच आहेत. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाचे आकडे बदललेले नाहीत. किमान आकडे तरी बदलायला पाहिजे होते,” असा टोला त्यांनी लगावला.
तसेच,
“30 कोटी बजेट असलेली नगरपालिका जिंकण्यासाठी भाजप आणि शिंदे गट 150-150 कोटी खर्च करतात. प्रचारासाठी चार्टर फ्लाइट, हेलिकॉप्टरचा वापर झाला. या निवडणुकांत पैशांची प्रचंड गारपीट झाली आहे. या पैशांच्या गारपिटीपुढे कोणी टिकू शकणार नाही,” अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.



