वणी तालुक्यात खळबळ; बेलोरा खदान चेक पोस्टजवळ पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला

यवतमाळ, दि. — :
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून एक धक्कादायक व खळबळजनक घटना समोर आली आहे. वणी–बेलोरा मार्गावरील बेलोरा खदान चेक पोस्टजवळ रस्त्याच्या कडेला एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
वणी तालुक्यात घनदाट जंगल, कोळसा खाणी व मानवी वस्ती यांचा जवळचा संपर्क असल्याने या भागात वाघांचा वावर नवा नाही. मागील काही दिवसांतही तालुक्यातील विविध भागांमध्ये वाघ दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच शनिवार, दि. २० रोजी सकाळच्या सुमारास बेलोरा खदान चेक पोस्टजवळ रस्त्याच्या कडेला वाघ मृतावस्थेत दिसून आला. ही बाब सकाळी कामगार व स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच तात्काळ वनविभागाला कळविण्यात आली.
माहिती मिळताच काही वेळातच वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विषबाधा, अज्ञात वाहनाची धडक किंवा नैसर्गिक मृत्यू अशा विविध शक्यता वर्तविल्या जात आहेत. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
संभाव्य धोका लक्षात घेऊन वनविभागाने संपूर्ण परिसर सील केला असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत वाघाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हलविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मानवी वस्तीच्या अगदी जवळ वाघांचा वाढता वावर आणि आता थेट मृत वाघ आढळून येणे, ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वणी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



