लाडेगाव रोडवर रानडुकरामुळे भीषण अपघात; ऑटो पलटी होऊन कुटुंब गंभीर जखमी

कारंजा (वाशीम), दि. — :
वाशीम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. लाडेगाव रोडवर अचानक रानडुक्कर समोर आल्याने ऑटो पलटी होऊन एक कुटुंब गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर कामरगाव पोलिस चौकीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कारंजा तालुक्यातील शिवण गावातील रहिवासी प्रमोद आनंदराव ढोरे, त्यांची पत्नी जिजाबाई प्रमोद ढोरे आणि मुलगी साक्षी प्रमोद ढोरे हे कामानिमित्त धनज येथील पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. रात्री सुमारे सात ते आठ वाजताच्या सुमारास काम आटोपून ऑटोने घरी परतत असताना लाडेगाव रोडवर अचानक रानडुक्कर ऑटोच्या समोर आडवे आले. या अनपेक्षित घटनेमुळे ऑटो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो रस्त्यावर पलटी झाला.
या भीषण अपघातात ऑटोमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातानंतर कामरगाव पोलिस चौकीतील अपुऱ्या मनुष्यबळाचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. कामरगाव पोलिस चौकीत दिवसा फक्त एक आणि रात्रीही केवळ एकच पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी थेट धनज पोलिस स्टेशनला जावे लागत आहे.
गावात वाद-विवाद किंवा गंभीर घटना घडल्यास एकाच पोलिस कर्मचाऱ्याने परिस्थिती कशी हाताळावी, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे कामरगाव पोलिस चौकी अंतर्गत सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होत असतानाही केवळ एक-दोन कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कारभार चालवला जात असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने मनुष्यबळ वाढवावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.



