अमरावतीत कचरा संकलन ठेक्यावर वाद कराराची पायमल्ली झाल्याचा आरोप; कोणार्क कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह

अमरावती, दि. ___ :
अमरावती शहरातील कचरा संकलन व्यवस्थेचा ठेका वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, अमरावती महानगरपालिका आणि कंत्राटदार कोणार्क कंपनी यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. करारानुसार नवीन गाड्या वापरणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात जुना व जीर्ण वाहनांचा वापर सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोणार्क कंपनीने एक तारखेपासून कचरा संकलनाचे काम सुरू केले असून, अवघ्या पंधरा दिवसांतच एका कचरा संकलन गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी गाडी अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याने, ती नवीन नसून जुनीच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या मते, अवघ्या १५ दिवसांत नवीन गाडीची अशी अवस्था होणे अशक्य आहे.
करारातील अटींनुसार कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व गाड्या ब्रँड न्यू असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ पेंटिंग व रंगरंगोटी करून जुन्याच गाड्या रस्त्यावर उतरवल्या आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे कराराच्या अटींची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप जोर धरू लागला आहे.
या प्रकारामुळे केवळ कंत्राटदार कंपनीवरच नव्हे, तर अमरावती महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या नियंत्रण व देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष तर करत नाही ना, असा संतापजनक सूर शहरात ऐकू येत आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, कोणार्क कंपनीवर कारवाई होणार का?, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार का, याकडे संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.



