ढाकुलगाव शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार; गाईवर हल्ला, ग्रामस्थांत भीती

धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली असून, शेतकरी व मेंढपाळ वर्गात दहशत पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ढाकुलगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात होती. यापूर्वी बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले होते; मात्र प्रत्यक्ष जनावराची शिकार झाल्याने भीती अधिकच वाढली आहे. शेतशिवारालगत असलेल्या दाट झुडपांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
या घटनेनंतर शेतकरी, मेंढपाळ व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जनावरे चरायला सोडणे तसेच पहाटे किंवा रात्री शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्यास सुरुवात केली आहे.
घटनेची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात पिंजरा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रात्री एकटे बाहेर जाणे टाळावे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.



