अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर; आयएएस आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे मार्गदर्शन करणार

अमरावती, दि. 18 : जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3’ चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर शुक्रवारी, दि. 19 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात पार पडणार आहे.
मार्गदर्शन शिबिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 20 वा क्रमांक पटकावणारे आयएएस अधिकारी आकाश वर्मा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 8 व्या क्रमांकाने उत्तीर्ण उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सदर शिबीर सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. यामध्ये UPSC आणि MPSC परीक्षांची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि यश मिळवण्याची सूत्रे यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.



