पुण्यात गँगवॉरची वाढती दहशत: खासगी क्लासमध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या, चाकणमध्ये टपोरी गँगचा जीवघेणा हल्ला

पुण्यातील गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही वर्षांपासून शहरात अल्पवयीन मुलांमधील गँगवॉरच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कोयता गँगवर नियंत्रण मिळवणं हे आधीच पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असताना, आता शहर आणि उपनगरांमध्ये गँगवॉरचे प्रकार वाढताना दिसत आहेत.
आज सकाळी पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. भल्या सकाळी एका खासगी क्लासमध्ये गँगवॉर झाला असून, या घटनेत अवघ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शिकवणी वर्गात लहान मुलांमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे मोठी खळबळ उडाली असून, पुण्यात नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (15 डिसेंबर) सकाळी खासगी क्लास सुरू असतानाच दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच क्लासमधील दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. शिक्षक शिकवत असतानाच आरोपी विद्यार्थ्याने समोरच्या मुलाचा गळा चिरल्याची माहिती आहे. हल्ल्यानंतर जखमी मुलगा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत विद्यार्थी आणि हल्ला करणारा विद्यार्थी दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून, हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातही गँगदहशतीचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका उच्चभ्रू सोसायटीच्या गेटसमोर टपोरी गँगकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. या टोळीने याआधीही परिसरात वारंवार गोंधळ घालून दहशत निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावेळी थेट हाणामारी करत तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणांनी गँगच्या दहशतीमुळे अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही. परिसरात या टोळीची भीती इतकी वाढली आहे की नागरिकांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे.
एकीकडे अल्पवयीन मुलांमधील हिंसाचार, तर दुसरीकडे खुलेआम गँगदहशत—या घटनांमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आता पोलिस प्रशासन या वाढत्या गुन्हेगारीवर कशी कारवाई करते, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.



