यवतमाळच्या मारेगाव तालुक्यात भीषण अपघात; ट्रकच्या जोरदार धडकेने एसटी बसचे दोन तुकडे, अनेक प्रवासी गंभीर

यवतमाळ — मारेगाव तालुक्यातील वणी–करंजी मार्गावर जळका फाट्याजवळ आज रात्री सुमारे ८ वाजता झालेल्या भीषण अपघातात एक एसटी बस आणि भरधाव ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन मोठी दुर्घटना घडली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की एसटी बस अक्षरशः दोन तुकडे झाली आणि बसचा समोरील भाग पूर्णपणे चिरडला गेला.
पहिल्या माहितीनुसार, वणीहून करंजीकडे जाणारी एसटी बस आणि करंजीकडून वणीकडे येणारा ट्रक यांच्यात ही भीषण टक्कर झाली. धडकेनंतर बसमधील प्रवाश्यांमध्ये अफरातफरीची स्थिती निर्माण झाली.
जखमींमध्ये बसचालकासह अनेक प्रवासी; काहींची प्रकृती गंभीर
या अपघातात बसचालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून सर्व जखमींना मारेगाव आणि करंजी येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर मारेगाव पोलीस पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक ग्रामस्थांनीही तत्परता दाखवत बचावकार्याला मदत केली व बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.
परिसरात खळबळ, पोलिस तपास सुरू
दुर्घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिकांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाहतूक विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या गंभीर दुर्घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



