मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठीची पदयात्रा धामणगाव रेल्वे येथे दाखल; उत्स्फूर्त स्वागतात पुढील वाटचाल नागपूरकडे

अमरावती — मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेली ऐतिहासिक पायी पदयात्रा आज धामणगाव रेल्वे येथे दाखल झाली. मुंबईहून नागपूरकडे निघालेल्या या भव्य जनआंदोलनाचे ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या पदयात्रेचा उद्देश —
- मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे
- अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे
अनेक दशकांपासून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा संघर्ष उभा राहिला आहे.
कसबे यांची टीका— “समाज मुख्य प्रवाहापासून दूर”
धामणगाव येथे बोलताना विष्णुभाऊ कसबे यांनी समाजाला संधी न मिळाल्यामुळे तो आजही मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याचे सांगितले.
“स्वतंत्र आरक्षणातूनच समाजाचा हक्क मिळू शकतो,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
१४ जिल्ह्यांतून यात्रा मार्गक्रमण
ही पदयात्रा राज्यातील १४ जिल्ह्यांतून जात असून, विविध ठिकाणी तिचे जोरदार स्वागत केले जात आहे.
१२ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर महापूरव ठरणाऱ्या उपस्थितीत सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
धामणगावनंतर ही पदयात्रा आर्वीमार्गे नागपूरकडे रवाना झाली असून, राज्यभरातून या लढ्याला मोठे जनसमर्थन मिळत आहे.



