अमरावती महापालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप; हॉकर युनियनची तात्काळ कारवाईची मागणी

अमरावती: अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांच्यावर शहीद भगतसिंग हॉकर युनियनने गंभीर आरोप केले आहेत. युनियनने पत्रकार परिषदेत कोल्हे यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
युनियनच्या दाव्यानुसार, कोल्हे हे अतिक्रमणधारक आणि हॉकर्सकडून नियमित हप्ते घेतात. जे हॉकर्स हप्ते देत नाहीत त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली जाते, तर जे देतात त्यांच्यावर कारवाई होत नाही.
पत्रकार परिषदेत युनियनने अनेक ठिकाणांची नावे घेतली जसे की: जयस्तंभ चौक, राजकमल चौक, प्रभात चौक, अमरावती बस डेपो परिसर, सायन्स कोअर मैदान समोर, तसेच नगर वाचनालयाजवळील खोके. युनियनने दावा केला की या ठिकाणी ‘अतिक्रमण’ असूनही कारवाई होत नाही आणि तिथून महिन्याला लाखोंची वसुली केली जाते.
युनियनने मनपा प्रशासनाला आवाहन केले की, योगेश कोल्हे यांच्यावर तात्काळ कारवाई केली जावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
अधिकारी आणि प्रशासनाकडून या आरोपांवर कोणती कारवाई होईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



