भोकरदन तालुक्यात पोलिसांची मोठी कारवाईकल्याणी शिवारातील बेकायदेशीर गांजा लागवड उध्वस्त; एक आरोपी अटक

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध पोलिसांनी बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर मोठी कारवाई करत एकाला अटक केली आहे. कल्याणी शिवारात सुरू असलेल्या अवैध लागवडीवर छापा टाकून सव्वा दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10.20 वाजता पारध पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गट क्र. 347 मध्ये गांजाची अवैध लागवड सुरू आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथक रवाना करून ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात नंदुसिंग जादुसिंग चांदा हा आरोपी रंगेहाथ पकडला गेला. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी आरोपी गांजाची झाडे लावून त्यांचे संगोपन करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
घटनास्थळावरून हिरवट रंगाची, उग्र वास असलेली मुळांसकट गांजाची झाडे, तसेच लागवडीसाठी वापरलेली माती असा एकूण 2,34,600 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाणे यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदुसिंग चांदाविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. माने हे करत आहेत.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.



