नागपूर पुस्तक महोत्सवात विद्यापीठाच्या स्टॉल ला प्रचंड प्रतिसाद कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी दिली सदिच्छा भेट

अमरावती (दि. 26.11.2025) – नागपूर शहरातील रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या नागपूर पुस्तक महोत्सवामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे 300 पेक्षा जास्त प्रकाशनाचे स्टॉल्स असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्टॉल ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर शनिवार दि. 22 नोव्हेंबर पासून पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली आहे. नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने आयोजित हा भव्य पुस्तक महोत्सव 30 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. महोत्सवामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व नामवंत लेखक, कवी, कथाकार, चित्रपट कलावंत सहभागी झाले असून त्यांची वेगवेगळी दालने महोत्सवात उपलब्ध झाली आहेत. अमरावती विद्यापीठ अंतर्गत अनेक तज्ज्ञ प्राध्यापक कर्मचारी यांची पुस्तके, त्यासोबतच विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागांतर्गत विविध योजना, युवा महोत्सव, इंद्रधनुष्य स्पर्धेतील कामगिरी, राष्ट्रीय सेवा योजनेची कामगिरी, विद्यावार्ता मासिक, सुयोग मासिक इत्यादीबद्दल माहिती प्रदर्शनी ठेवण्यात आलेली आहे. या स्टॉलला हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, समाजातील गणमान्य व्यक्तींनी भेट दिलेली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी भेट दिली व या स्तुत्य उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, राष्ट्रीय सेवा योजना संचालक निलेश कडू उपस्थित होते. या पुस्तक महोत्सवामध्ये हजारो पुस्तकांची विक्री होणार आहे. पुस्तक महोत्सवाला अधिकाधिक विद्यार्थी, प्राध्यापक, पालकांनी भेट द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे.



