गणेशपेठमध्ये प्रेमप्रकरणातून २४ वर्षीय तरुणाची हत्या; पोलिसांची केवळ काही तासांत आरोपींना अटक

गणेशपेठ पोलिस ठाणे हद्दीत प्रेमसंबंधातील वादातून एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करून केवळ काही तासांत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटना कशी घडली?
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या गाडीखाना मैदानाजवळ साडेनऊ वाजताच्या सुमारास अमन गौतम मेश्राम (वय 24) याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. अमन मेश्राम हा एन.आय.टी. गार्डन, जुना बगडगंज परिसरातील रहिवासी होता.
रात्री आरोपी—
- अमित रामराव शिवरकर
- हेमंत चैतन्येश्वर बागडे
- तेजस्वीनी जगन कावळे
या तिघांनी मिळून अमनशी प्रेमप्रकरणातील वादातून तीव्र वादविवाद केला. वाद चिघळल्यानंतर आरोपी अमित शिवरकरने अमनवर चाकूने वार केला.
गंभीर जखमी अवस्थेत अमनला तातडीने मेडीकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीसांची जलद कारवाई
या प्रकरणी अमनची चुलत बहीण प्रणाली गौतम खोब्रागडे हिने तक्रार दाखल केली. गणेशपेठ पोलिसांनी—
कलम 103(1), 352, 3(5) भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पो.उप.नि. सोनवणे आणि त्यांच्या टीमने तातडीने तपास सुरू केला. केवळ काही तासांतच तिन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
तपास सुरूच…
खून नेमका कोणत्या कारणावरून झाला?
वादामागे आणखी कोणते गुपित दडले आहे का?
याचा तपास गणेशपेठ पोलिसांकडून सुरू आहे.



