Latest News

पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या; कुटुंबीयांची CBI चौकशीची मागणी

मुंबई | भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला होता. विवाहाला अवघे दहा महिने होत असताना वरळीतील निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी उघड झाली.

सायंकाळी सातच्या सुमारास घटना घडली असून प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून आत्महत्या झाल्याचे समोर येत आहे. वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. डॉ. गौरी केईएम रुग्णालयातील दंत विभागात कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गौरी यांना पतीचे अन्य महिलेशी संबंध असल्याचा संशय होता, यावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

अनंत गर्जे यांच्या म्हणण्यानुसार, घटना घडली तेव्हा ते घरी नव्हते. घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी वरच्या मजल्याच्या खिडकीतून खाली उतरून घरात प्रवेश केला असता गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या आणि तत्काळ रुग्णालयात नेण्यात आल्या. मात्र, गौरीच्या नातेवाईकांनी या आत्महत्येवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की गौरी सतत तणावात होती आणि दोन महिन्यांपासून वाद वाढत होते. लग्नासाठी कुटुंबीयांनी मोठा खर्च केला होता, तरीही गौरीच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत, असे ते म्हणाले.

कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाची CBI चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचाही गौरीच्या नातेवाईकांनी स्पष्ट केला आहे, मात्र दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button