Latest NewsMaharashtra

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विषयपुन्हा पेटणार काटईत ‘दि. बा. पाटील’नावाच्या जयघोषाने आंदोलनाची ठिणगी

डोंबिवली, 25 ऑक्टोबर 2025:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तीव्र होत आहे. डोंबिवलीजवळील काटई गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहादरम्यान ‘दि. बा. पाटील’ यांच्या नावाच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले असून, या मागणीला नव्याने वेग मिळत आहे. हरिनामाच्या गजरात भूमिपुत्रांच्या हक्काचा आवाज पुन्हा जोर धरत असून, धार्मिक मंचावरून आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.

सात दिवस चालणाऱ्या काटई किर्तन सेवा सप्ताह महोत्सवात श्रद्धा आणि समाजकारणाचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे. दररोजच्या कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकला जात आहे. मात्र, यंदा भक्तिभावाबरोबरच ‘दि. बा. पाटील विमानतळ’ या मागणीचा स्वर अधिक प्रखर झाला आहे.

शुक्रवारी (18 ऑक्टोबर) सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनकार महाराज आणि ग्रामस्थांनी एकमुखाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि. बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा ठाम आग्रह व्यक्त केला. संविधानिक मार्गाने पुढील आंदोलन उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. “दि. बा. जागर” या उपक्रमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत या मागणीची जाणीव पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी दि. बा. पाटील यांच्या शेतकरी, कामगार आणि भूमिपुत्र चळवळीतील योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख करत सांगितले की, “भूमिपुत्रांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणाऱ्या त्या नेत्याचं नावच या भूमीच्या आकाशात झळकायला हवं.” या उद्गारांनंतर गावकऱ्यांच्या जयघोषांनी परिसर दणाणून गेला.

काटईसह परिसरातील गावांमध्ये या विषयावर चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सप्ताहाची सांगता रविवारी होणार असून, त्या दिवशी ‘दि. बा. पाटील’ या नावाच्या समर्थनाचा स्वर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळातही या हालचालींकडे लक्ष लागले असून, विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘दि. बा. पाटील’ यांच्या नावावर करण्यासाठी कृती समितीद्वारे रविवार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब, वाशी सेक्टर-1/अ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांकडून केंद्र सरकारकडे नामकरणासाठी आवश्यक नियमावली मसुदा त्वरीत पाठवण्याची मागणी करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नामकरण मंजूर व्हावे, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्च काढण्याचा प्रस्तावही चर्चेला येणार आहे.

विमानतळाच्या उद्घाटनावेळी दि. बा. पाटील यांच्या कार्याची स्तुती करण्यात आली होती; मात्र नामकरणाचा निर्णय न झाल्याने भूमिपुत्र समाजात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आता या आंदोलनाला नव्या जोमाने सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button