झेंडू शेतकरी संतापले! बुलढाण्यात दिवाळीत फुलांना कवडीमोल भाव, रस्त्यावर फेकून दिली माळ

बुलढाणा – दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरच्या बाजारपेठांमध्ये मोठी लगबग दिसून येत आहे. खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली आहे. विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या मूर्ती खरेदीसाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. बाजारात १०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत आणि नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
पण, या उत्साहाच्या वातावरणात एक निराशाजनक चित्र समोर आलं आहे. ते म्हणजे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचं. दिवाळीत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी मिळेल आणि चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. बाजारात झेंडूच्या फुलांना अत्यंत कवडीमोल भाव मिळत आहे आणि त्यातही अपेक्षित मागणी नाही.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आणि नाराजीचं वातावरण आहे. फुलांना योग्य भाव न मिळाल्याने आणि शेतीत केलेला खर्चही वसूल होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अक्षरशः आपली फुलं रस्त्यावर फेकून दिली. शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या उत्साहावर अक्षरशः पाणी फेरले गेले आहे आणि सरकारबद्दल शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.



