प्रेम प्रकरणात एकाच शेडखाली दोघांनी संपविला जीवन प्रवास

लातूर तालुक्यातील पेठ शिवारात रात्रीच्या वेळेस ही हृदयद्रावक घटना घडली… शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. मृत मुलगी राणी दराडे, वय २५, मूळची दरडवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील रहिवासी होती. ती लातूर मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून काम करत होती. तर मृत युवक नितीन संदिपान दराडे, वय ३२, हाही दरडवाडी, अंबाजोगाई येथील होता.
दोघांमधील प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता का? की अन्य काही कारणामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत.
दोघांच्या मोबाईलवर नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण दोघांचेही फोन बंद असल्याने शंका आली. शोध घेतला असता शेडमध्ये गळफास घेतलेले त्यांचे मृतदेह आढळले. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही दराडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास लातूर ग्रामीण पोलीस करत आहेत.



