ST आरक्षणासाठी धनगर समाजाचा भव्य रास्ता रोको आंदोलन

लातूर जिल्ह्यातील औसा टी पॉइंट परिसरात अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने आज मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान समाजाच्या कार्यकर्त्यांनी “धनगर समाजाला ST आरक्षण मिळालंच पाहिजे”, “खोटे गुन्हे मागे घ्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
धनगर समाजाची प्रमुख मागणी म्हणजे –
1. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
2. आरक्षणासाठी लढणाऱ्या समाज बांधवांवर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शासनाने १५ दिवसांच्या आत ST आरक्षणाचे प्रमाणपत्र वाटप सुरू केले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येईल. या रास्ता रोकोदरम्यान सोलापूर–नॅशनल हायवेवरील दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, धनगर समाजाचा संयम आता सुटला आहे.
आरक्षणाचा प्रश्न केवळ आश्वासनांत न अडकवता तात्काळ अमलात आणावा, अन्यथा येणाऱ्या काळात शासनाला समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल.



