रात्रीच्या अंधारात उभ्या ट्रकच्या टायरची चोरी

ही घटना भोकरदन तालुक्यातील धावडा गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नसीमखान जमीरखान पठान यांच्या नावे असलेला ट्रक क्रमांक MH19CY1938 हा रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. सदर ट्रकचे चालक अलीम नसीमखान पठान (वय 27, रा. धावडा) यांनी रात्री गाडी उभी करून घरी परतले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकची पाहणी केली असता, मागील बाजूचे दोन टायर डिक्ससह गायब असल्याचे दिसून आले. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ट्रकला जॅक लावून दोन्ही टायर काढले आणि घटनास्थळावरून फरार झाले. ही घटना ११ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास ते १२ ऑक्टोबरच्या सकाळी ७ वाजेदरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर चालक अलीम पठान यांनी भावांसह परिसरात शोध घेतला, परंतु चोरी गेलेल्या टायरांचा काहीही मागमूस लागला नाही. चोरीस गेलेल्या टायरांची एकूण किंमत सुमारे ३० हजार रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच परिसरातील संशयित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावण्यात येत आहे.



