माहूर शहरात ‘महास्वच्छता अभियाना’चा धुमधडाका | तुंबलेल्या नाल्या कोरड्या, खड्डे बुजवण्यास सुरुवात

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात सध्या महास्वच्छता अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक नाले तुंबले होते, तर रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या गंभीर समस्यांची दखल घेत नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड, स्वच्छता दूत गणेश जाधव आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली. आता याच पाहणीच्या आधारावर टप्प्याटप्प्याने हे महास्वच्छता अभियान राबवले जात आहे.
अभियानांतर्गत शहरातील तुंबलेल्या नाल्या कोरड्या करणे, त्यातील गाळ आणि कचरा काढून टाकणे, तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रहदारी सुरळीत करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. विशेष म्हणजे रस्त्यांवरील छोट्या पुलांखाली साचलेला दगड, माती आणि कचरा काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
पावसाळा संपल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार वाढले आहेत. नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी खबरदारी म्हणून नगरपंचायतीने हागणदारी मुक्तीला प्रथम प्राधान्य दिले आहे.
एवढेच नाही, तर घनकचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपंचायत कंबर कसून कामाला लागली आहे. रोगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपंचायतचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.



