पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन; लोकार्पणपूर्वी लोककलेचा रंगारंग कार्यक्रम

नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आणि मेट्रो 3 च्या अखेरच्या टप्प्याचं औपचारिक उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच ज्येष्ठ नेते शरद पवारही उपस्थित राहणार आहेत.
प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असून, त्यावेळी अग्निशमन दलाकडून विमानाला पाण्याची सलामी दिली जाईल. त्यानंतर मोदी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीची आणि एकूण प्रकल्पाची माहिती जाणून घेतील. औपचारिक उद्घाटनानंतरही प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, विमानतळावरील वाहतूक भारही कमी होण्यास मदत होईल. उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा जागरही अनुभवता येणार आहे. सिडको महामंडळ आणि अदानी उद्योग समूहाच्या वतीने कोल्हापूरची लावणी, नाशिकचा दहीहंडी नृत्याविष्कार, विदर्भातील गोंधळी, कोकणातील झेलक्यांचा ठेका, तसेच आदिवासी आणि आगरी-कोळी नृत्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हे सादरीकरण विमानतळाच्या लोकार्पणाआधी संपूर्ण परिसरात रंगतदार वातावरण निर्माण करणार आहे.



