Latest NewsMaharashtra

अम. मनपा आयुक्तांचा पंचवटी ते आय.एम.ए. हॉलपर्यंत स्वच्छतेचा पाहणी दौरा

अमरावती : अमरावती महानगरपालिका आयुक्‍त सौम्‍या शर्मा चांडक यांनी आज सकाळी शहरातील काही महत्त्वाच्या परिसरांचा दौरा करत स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी पंचवटी परिसर, पीडीएमसी परिसर, हॉलीक्रॉस शाळा परिसर आणि आय.एम.ए. हॉल परिसरातील रस्ते, गल्लीबोळ, वसाहती यांची पाहणी केली. आयुक्तांनी पाहणीदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ओला आणि सुका कचरा विभाजनाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली.
कचरा वेळेवर उचलला जातो का, डंपिंग स्पॉटची स्थिती काय आहे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद दिला जातो का, याचीही त्यांनी सखोल चौकशी केली. आयुक्तांनी संबंधित झोन अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि विभागीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, शहरातील प्रत्येक गल्ली, चौक, आणि वसाहत स्वच्छ ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत, त्या ठिकाणी तात्काळ साफसफाई करून तेथे सौंदर्यीकरण करावे, असे आदेश आयुक्‍तांनी दिले. तसेच, IEC अंतर्गत काम पाहणाऱ्या प्रतिनिधींनाही नागरिक जनजागृतीसाठी अधिक प्रभावी मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, “स्वच्छता ही फक्त प्रशासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
ओला आणि सुका कचरा वेगळा करून महानगरपालिकेच्या वाहनांना द्यावा, रस्त्यावर कचरा न टाकता शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. या पाहणीदरम्यान अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्पा नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय बुरे, स्वच्छ भारत मिशन अमरावती शहर समन्वयक श्र्वेता बोके, स्वास्थ्य निरीक्षक आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्तांच्या या पाहणीमुळे स्वच्छ अमरावती मोहिमेला नवे बळ मिळाल्याचे नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button