वाघोड रेल्वे पुलाखालील मोठा खड्डा बनला अपघातांचा सापळा

रावेर तालुक्यातील वाघोड गावातून मोरगाव, खिरवड, पातोंडी, मुक्ताईनगरकडे जाणारा मुख्य मार्ग म्हणजे मोरगाव रोड. या रस्त्यावरून मध्य रेल्वे लाईन पार करण्यासाठी वाघोड गावालगत एक जुना बोगदा आहे. मात्र या बोगद्यातील स्लॅब गेल्या जवळपास वर्षभरापूर्वी खाली गेला आणि त्याठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. हा खड्डा कायम पाण्याने भरलेला असल्यामुळे वाहनचालकांना खोल खड्ड्याचा अंदाजच येत नाही. परिणामी दररोज दुचाकी, चारचाकी चालकांना तोल जातो, वाहनांचे नुकसान होते आणि अपघात घडत आहेत. मागे याच ठिकाणी रेल्वे पुलाखालील स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली होती. त्यामुळे नागरिकांना भीती वाटते की पुन्हा अशीच दुर्घटना घडू नये. वाघोड ग्रामपंचायतीने मागे तात्पुरत्या उपाययोजनेत मुरूम टाकून तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अलीकडच्या पुरामुळे तो मुरूम वाहून गेला आणि खड्डा पुन्हा पूर्ववत झाला आहे. आज या रस्त्यावरून जाणारे शेतकरी, शेतमजूर आणि वाहनधारक खड्डा टाळत अत्यंत जोखमीने प्रवास करत आहेत. ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाला वारंवार कळवूनही अद्याप कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे झाली नाहीत.
म्हणूनच नागरिकांनी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी त्वरित तपासणी करून नवीन स्लॅब टाकून दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली आहे.



