धारणीत 151 लिटर दूध घोटून साजरी झाली कोजागिरी पौर्णिमा

धारणी – धारणी शहरातील राधाकृष्ण नगर जे शहरातील एक नामांकित व ऐक्याचे प्रतीक असलेले नगर म्हणून ओळखले जाते . येथे काल कोजागिरी पौर्णिमेचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी 151 लिटर दूध एकत्र करून त्यात केशर, वेलदोडा, बदाम यांचा सुवासिक स्वाद मिसळण्यात आला आणि ते संपूर्ण नगरवासीयांना वाटप करण्यात आले. रात्री बारा वाजता शुभमुहूर्तावर चंद्र दर्शनानंतर पूजा-अर्चा पार पडली. कोजागिरीच्या या चांदण्यात सर्व नागरिकांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमात महिलांनी आणि चिमुकल्यांनी संगीत खुर्ची, हास्य जोक्स, कविता सादरीकरण, आणि गायन स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली कला सादर केली. हास्यविनोद आणि गप्पाटप्पांतून वातावरण रंगले.
राधाकृष्ण नगरातील सर्व नागरिकांनी एकजुटीने हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून समाजात ऐक्य, आनंद आणि संस्कृतीचे सुंदर उदाहरण घालून दिले.



